मी व्यथित झालोय; अनिल देशमुखांचा खुलासा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या  सगळ्या वादावर अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरून भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे.

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, असं सांगत राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यानंतर भाजपाने देशमुखांच्या पत्रकार परिषदेवरून सवाल केला. 

 

अनिल देशमुख यांनी ट्विटरवर व्हिडीओ ट्विट केला आहे. ते म्हणतात,” काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे. कोरोनाच्या एक वर्षाच्या काळात आमच्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. नागपूरला पाच फेब्रुवारीला मी कोरोनाबाधित झालो. त्यानंतर ५ ते १५ फेब्रुवारी मी नागपूरच्या एलिक्झर रुग्णालयात दाखल होतो. १५ फेब्रुवारीला जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला, तेव्हा होम क्वारंटाईनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो”, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

“होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूरमध्ये मी हॉस्पिटलला जाण्याच्या वेळेदरम्यान आणि मुंबईतील होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर एक मार्चपासून आमचं अधिवेशन होतं. त्याच्या कामाला मी लागलो. त्या दरम्यान अधिवेशनासाठी आमची जी प्रश्नोत्तरं होती. लक्षवेधी सूचना होत्या. त्याच्या मीटिंगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. त्यानंतर शासकीय कामासाठी पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो. जनतेत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने जनतेला चुकीची माहिती देण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती देत आहे,” असं सांगत देशमुख यांनी क्वारंटाईनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

 

पवार यांना व्यवस्थित माहिती मिळाली नसून कोणाकडून दिशाभूल केली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुळे नागपूरला रुग्णालयात होते, तरी १५ फेब्रुवारीला त्यांना घरी सोडण्यात आले व त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली. याबाबतचा व्हिडीओ देशमुख यांच्याच ट्विटरवर आहे. परमबीर सिंह यांच्या पत्रामध्ये साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या व्हॉट्सअ‍ॅप संभाषणाचा उल्लेख आहे, त्यातील तपशिलात गृहमंत्र्यांबरोबरची भेट फेब्रुवारीअखेरीस झाल्याचे दिसून येत आहे, असे फडणवीस म्हणाले होते.

Protected Content