जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ना. गुलाबराव पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर देण्याची घोषणा केल्यानंतर आज त्यांच्या समर्थकांनी देखील पाचोर्याकडे कूच केले असून तेथे संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज उध्दव ठाकरे जळगाव जिल्ह्यात असून याआधीपासूनच शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुगलबंदी रंगली आहे. या सभेच्या दोन दिवस आधीच अर्थात परवा रात्री खासदार संजय राऊत हे जिल्ह्यात दाखल झाले. ते रेल्वे स्थानकावरून मुक्कामाकडे जात असतांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राऊत यांचा निषेध केला. यानंतर काल सकाळी पत्रकार परिषदेत बोलतांना खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केले होते.
गुलाबराव पाटील यांनी कोरोनाच्या काळात मोठा घोळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला. तर गुलाबराव पाटील यांची गुलाबो गँग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आपले सहकारी पाचोरा येथील सभेत शिरणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यासोबत त्यांचे समर्थक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हाप्रमुख सरीता माळी-कोल्हे यांनी आपण गुलाबभाऊंचे मुखवटे घालून पाचोरा येथील सभेत शिरणार असल्याची घोषणा केली. यानुसार गुलाबभाऊंचे शेकडो समर्थक हे पाचोर्याकडे रवाना झाले आहेत. आता ते सभेत शिरण्याचा प्रयत्न करणार असल्याने तेथे संघर्ष होण्याची शक्यता आहे.