मुंबई प्रतिनिधी । दोन वर्षापूर्वीच्या रायगड येथील व्हिडीओत आपण तोंडाने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे बोललो होतो., मात्र आता याचा माझ्या बदनामीसाठी उपयोग केला जात असल्याचे स्पष्टीकरण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आज सकाळी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. रायगड किल्ल्यावरील या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे. यावरन अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीसह नवाब मलिक यांच्यावर टिकेची झोड उठविली आहे. नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, हा व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे. माझ्या भोवती सहकारी उभे असल्याने आपल्याला हात उचलता आले नाही. तथापि, आपण तोंडाने ‘छत्रपती महाराज की जय’ असे म्हणत होता. आता मात्र हा व्हिडीओ व्हायरल करून आपली बदनामी केली जात असल्याबद्दल मलिक यांनी खंत व्यक्त केली.