एका गावात चिक्कूवरून वाद ; दोन गटात मारहाण

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील बिडकीन गावामध्ये काल (रविवारी) एका ‘चिक्कू’वरून दोन गट भिडल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये काही लोकं जखमी झाले आहेत. गावातील तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण 17 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिडकीन पोलिस ठाण्यात रईस शेख बाबू (वय 33 वर्षे, व्यवसाय फळविक्रेता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘त्यांचा अल्पवयीन भाचा बिडकीन बस स्टँड परिसरात फळाच्या दुकानात बसलेला होता. यावेळी तिथे कृष्णा वाघ हे चिक्कू विकत घेण्यासाठी आले. त्यांनी चिक्कू दाबून पाहिला तेव्हा तो चिकू फुटला. यावेळी दुकानात बसलेल्या मुलाने चिक्कू फोडू नका असे म्हणल्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
सुरवातीला शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्यांनतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी चिकू विकत असलेला मुलगा जखमी झाला. त्यानंतर फिर्यादी रईस शेख हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपल्या जखमी भाच्याला घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना आणखी काही जण तिथे जमा झाले. त्यानंतर पुन्हा एकदा वाद सुरू झाला.
दोन्ही गटाचे लोकं जमा झाले. गोंधळ सुरू झाला, दोन्ही गटाकडून एकमेकांना हाणामारी सुरू झाली. काहींनी दगड फेकून मारले. त्यातील एका व्यक्तीने वस्तारा मारल्याने त्यामध्ये एक जण जखमी झाला. या घटनेत एकूण ५ ते ६ जण जखमी झाले, त्यांच्यावर बिडकीन शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणली.

तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण 17 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content