नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या भेटीपासून ज्येष्ठे अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. काल मिथून यांनी पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतल्यानंतर अखेर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ते कोलकातामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहे. याचदरम्यान अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पक्षात प्रवेश केला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मिथून चक्रवर्ती यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचं चक्रवर्ती यांनी सांगितलं होतं. काल मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती.
२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.