मित्राच्या निराधार कुटुंबाला पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे आर्थिक मदत

पाचोरा, प्रतिनिधी । कामांत निष्णांत व मनमिळाऊ सहकाऱ्याचा कोरोनाची लागण होवून मृत्यू ओढवल्याने  त्याच्या निराधार कुटुंबाला पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने एकलाखाची मदत करून मित्रत्वाची साक्ष व माणुसकीचे दर्शन घडविले आहे.  

 

पंधरा दिवसात आईनंतर मुलाचा देखील कोरोना आजाराने मृत्यू झाला. बांधकाम ठेकेदारांची ई – टेंडरिंगचे काम करून कुटुंबाची रोजीरोटी चालविणाऱ्या दत्त कॉलनीतील अशोक उर्फ़ बाळू भोसले ३८ वर्षीय या तरुणाचा कोरोना आजाराला तब्बल सव्वीस दिवस झुंज दिल्यानंतर मृत्यू झाला.  बाळू भोसले हा बांधकामाची कामे घेण्यासाठी भरण्यात येणारे ई- टेंडरिंगच्या कामात निष्णात होता. बरेचसे बांधकाम ठेकेदार त्याच्या कडून ही कामे करून घेत होते. बाळूचा मनमिळाऊ स्वभाव आणि मेहनती वृत्तीमुळे तो सर्वांना आपलासा वाटत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. उपचारा दरम्यान तो सतत आईच्या सेवेत संपर्कात होता. आई उपचार घेत असतांना बाळू भोसलेला देखील कोरोनाची लागण झाल्याने त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करावे लागले. या दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्या बाळूला ही दुःखद बातमी माहिती पडू दिली नाही. पंधरा दिवसात तब्येत जास्त खालावल्याने त्याला पाचोरा येथून औरंगाबाद येथे हलविण्यात आले. परंतु, उपचारा दरम्यान बाळू भोसलेचा मृत्यू झाला. पाचोरा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्यातील एक सहकारी गमावल्याची जाणीव ठेवली. त्याच्या निराधार कुटुंबाला एकलाख एक हजार रोख रक्कम मदत करून कठीण व दुःखद प्रसंगात धाव घेऊन मित्रत्वाची साक्ष देत माणुसकीचे दर्शन घडविले.   याप्रसंगी जेष्ठ कॉन्ट्रॅक्टर, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते दत्ता बोरसे पाटील, नगरसेवक शितल सोमवंशी, भाऊसाहेब कुमावत, स्वप्नील बाहेती, अभियंता दिपक एम. पाटील, गोपाल चिंचोले, राकेश पाटील, दिपक शिंदे, किशोर पाटील, पप्पू सैंदाने यांनी रोख रक्कम स्व.बाळू भोसले यांच्या पत्नी व मुलांकडे स्वाधीन केली.

Protected Content