मित्रांच्या नावावर परस्पर धानदेश वर्ग करून ऑफीसबॉयचा साडे नऊ लाखांवर डल्ला

चाळीसगाव प्रतिनिधी । ऑफिसमधील टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेल्या चेकच्या सहाय्याने ऑफिसबॉयने ९ लाख ६० हजार रुपये एकाच्या खात्यातून मित्राच्या खात्यात वर्ग केल्याची धक्कादायक घटना शहरातील ‘अमित’ महात्मा फुले सोसायटीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, अरूण त्र्यंबकराव भावसार (वय- ७७) रा. ‘अमित’ महात्मा फुले सोसायटी, भडगाव रोड, ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून गेल्या चाळीस वर्षांपासून वास्तूविशारद (आर्कीटेक्ट) म्हणून कार्यरत आहेत. शहरातील श्रीकृष्ण सिनेमागृह समोर येथे त्यांचे ऑफिस आहेत. सध्या या ऑफिसमध्ये आर्कीटेक्ट कामासाठी संजय मानकर व जयंत बी. जाधव हे अभियंता म्हणून कार्यरत असून राजेंद्र रमेश गहिणे (वय- ३५ रा. जहागिरदारवाडी ता. चाळीसगाव) हे सन २०११ सालापासून ऑफिसबॉय म्हणून काम बघत आहेत. त्याचबरोबर बॅंकेत पैसे भरणे वा काढणे, चेक भरणे, पासबुक भरणे व इतरही कामे ऑफिसबॉय राजेंद्र गहिणे हा करीत असतो. दरम्यान पत्नी मिनल अरूण भावसार (वय-७४) हिचे बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत २०१५ सालापासून बचत खाते आहे. त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशातून पती अरूण भावसार हे लाईट बिल व इतर बिले भरण्यासाठी सह्या केलेली चेक आपल्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेले होते. दरम्यान कर सल्लागार संजय खैरनार यांचा फोन आला की, तुमच्या पत्नी मिनल भावसार हिच्या बॅंक ऑफ बडोदाच्या चेक नं. २३ द्वारे खात्यातून २४ मार्च २०२१ रोजी ९,६०,००० रूपये हे नामे कुणाल संतोष शिंदे व्यक्तीच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर भावसार यांनी ऑफिस गाठून पत्नीने सही केलेली चेकची पाहणी केली असता चेक चोरीला गेल्याचे दिसून आले. मग भावसार यांनी सदर चेक कोणत्या बॅंकेत व केव्हा भरला याविषयी अधिक माहिती घेतली. व ऑफिसबॉय राजेंद्र गहिणे यांचे सुध्दा बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत (चाळीसगाव शाखा) बचत खाते असल्याने भावसार यांनी १ मार्च ते १९ एप्रिल २०२१ दरम्यानचा  बॅंक स्टेटमेंटची माहिती घेतली. तेव्हा त्याच्या खात्यावर २९ मार्च रोजी कुणाल शिंदे या व्यक्तीने दोन वेळा प्रत्येकी ५० हजार रुपये असे एकूण १ लाख रुपये जमा केल्याचे दिसून आले. त्यामुळे ऑफिसबॉय राजेंद्र गहिणे यांनी त्यांच्या ओळखीचे कुणाल शिंदे यांच्या संगनमताने ९,६०,००० रूपये चेक द्वारे रक्कम काढून घेतली असल्याचे खात्री झाल्याने अरूण त्र्यंबकराव भावसार हे चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३८१, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सैय्यद हे करीत आहेत.

Protected Content