मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं होणार अर्ध

;

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । “सांगितलं गेलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

 

नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत होतं. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.

 

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दारावर ठिय्या मांडला आहे. शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं बैठक बोलावली. मात्र, शेतकरी संघटनांसोबतची बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली-नोएडा सीमेवर शेतकऱ्यांचे जत्थे दाखल झाल्यानं दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनीही भाजपवर दबाव वाढवला आहे. राजस्थानमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख व लोकसभेतील खासदार हनुमान बेनिवाल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात व नवे कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. देशाचा अन्नदाता कडाक्याच्या थंडीत आणि कोरोनाच्या संकटात आंदोलन करत असून केंद्र सरकारसाठी ही बाब योग्य नव्हे. कृषी कायदे रद्द झाले नाही तर ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा इशाराही बेनिवाल यांनी दिला आहे. याच मुद्यावरून शिरोमणी अकाली दलही ‘एनडीए’तून बाहेर पडला होता.

Protected Content