मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ४९ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दिवसभरात १७,८५३ जणांवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले असून रेल्वेतही कारवाईने वेग घेतला आहे. पोलीस, रेल्वे आणि मुंबईभर पालिकेने केलेल्या कारवाईतून एका दिवसात ३६ लाख ४२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला
मुंबईत अनेक जण विनामुखपट्टी फिरत असतात.आता पुन्हा मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई पालिकेने तीव्र केली आहे. मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने फेब्रुवारीमध्येच क्लिन अप मार्शल्सची संख्या दुप्पट केली.
मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे गाडय़ांमध्ये मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्येक रेल्वे मार्गावर १०० यानुसार एकूण ३०० मार्शल्स नेमण्यात आले आहेत.