जळगाव, प्रतिनिधी । येथील संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान, समस्त माळी समाज पंच मंडळे, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य उपवर-वधू मेळावा २०२१ च्या सुचीचे प्रकाशन नुकतेच शरद क्रिएशन्स् येथे करण्यात आले. तसेच, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाळधी येथील माळी समाजाचे आधारस्तंभ दिलीप पाटील हे होते. तर पुस्तीका विमोचन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन दिलीप महाजन (पाळधी), जेष्ठ समाजसेवक धोंडीबा महाजन, उद्योजक संजय महाजन, प्रदिप महाजन उपस्थित होते. सदर पुस्तीकेत एकुण ५०० पेक्षा अधिक मुला-मुलींचे परिचय समाविष्ठ करण्यात आलेले आहेत. यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात असे विविध ठिकाणाहून मंडळास परिचय पत्रे आलेली आहेत.
माळी समाजाच्या परिचय सूची पुस्तकाचा लाभार्थ्य्यानी लाभ घेऊन विवाह सोहळा आदर्श स्वरुपात पार पाडावे असे आवाहन अध्यक्षस्थानावरून दिलीप पाटील यांनी करीत सुचीच्या प्रकाशनास शुभेच्छा देवून कौतुक केले. त्यानंतर जेष्ठ समाजसवेक धोंडीबा महाजन यांनी, समाज एकरुप व एकत्रीत राहील याची काळजी घेतली जावी असे आवाहन करून मुला-मुलींनी संस्कारासोबत संयुक्त कुंटुंबपध्दतीत वावरणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पोलीस दलातील कार्यरत एकनाथ महाजन यांना शाल, श्रीफळ देवुन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान,जळगांव यांचेकडून देणगी स्वरुपात रु. पाच हजाराचा धनादेश श्रीराम मंदिर देवस्थानाच्या बांधणीसाठी देण्यात आला. तसेच कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, पत्रकार बांधवांनी केलेल्या कार्याचा गौरव सन्मान सुध्दा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महिलांच्या हळदी-कुंकवाने करण्यात आली. प्रास्तावीक धनराज माळी यांनी तर सुत्रसंचालन डी. बी. महाजन यांनी तर आभार वाय. एस. महाजन यांनी मानले.
कार्यक्रमासाठी श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे, सदस्य सुनिल महाजन, गोपाळ चौधरी, वाय. एस. महाजन, डी. बी. महाजन, धनराज माळी, वैशाली सोमनाथ महाजन, श्रध्दा मोरे, रोहित मोरे, धनंजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन, संदिप माळी आदींचे सहकार्य लाभले.