अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील गोवर्धन-मारवड -बोरगाव सह परिसराचे आराध्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथा पैकी एक असलेल्या श्री कालभैरव नाथांचा दोन दिवसीय यात्रोत्सव माळण नदीकाठी साजरा करण्यात येणार असून यासाठी मंदिर संस्थान व पोलीस प्रशासन यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सज्ज झाले आहे , मात्र भाविकांनी कोरोना नियंत्रणसाठी मास्क घालूनच दर्शनासाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे
अमळनेर तालुक्यातीलच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराध्य दैवत असलेल्या भारतातील स्वयंभू स्थान असलेले श्री कालभैरवनाथ मंदिराचा महिमा चहोदूर असल्याने सालाबादप्रमाणे कार्तिक अष्टमीला जयंतीच्या रुपात कालभैरव नाथांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. फक्त मागील वर्षी यात्रोत्सव न भरवता यावर्षी धुमधडाक्यात यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होऊन दिवसभर महाप्रसाद वाटप करून वरील तिन्ही गावातीलच आबालवृद्ध दिवसरात्र सेवा देऊन कालभैरव नाथांची रक्षा (धुनी ) कपाळी लावून नवसपूर्तीसाठी विशेष गर्दी होते. यासाठी गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे यात्रोत्सव साजरा केला नव्हता. मात्र, यावर्षीही कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरून दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे , यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता मंगल आरती व ध्वजारोहण तसेच सकाळी नऊ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. अष्टमी निमित्त संपूर्ण खानदेशासह दुरवरील भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. कालपासूनच माळन नदीच्या पात्रात पाळणे, पालखे, विविध विक्रेते, खेळने विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकानांची रेलचेल सुरू झाली आहे. संपूर्ण देशात असलेल्या तीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरातील यात्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येणार असून दोन वर्षापासून बंद असलेला यात्रोत्सव यंदा होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.
पाडळसरेत केसरी भैरवनाथ जयंतीनिमित्त पूजन व महाप्रसादाचेआयोजन
नवीन पुनर्वसित पाडळसरे गावाच्या शिवेवर पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या केसरी भैरवनाथ जयंतीनिमित्त मंदिरात सकाळी अभिषेक , पुजन व प्रांत आरती होऊन नवसपूर्तीचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे भैरवनाथ मंदिराचे सेवेकरी हभप हिरालाल पाटील यांनी कळविले आहे.