नवी दिल्ली : वृत्तसंस्था | ६५ हजार फुटापेक्षा जास्त उंचावरुन सलग ९० दिवस उड्डाण करण्याच्या दृष्टीने ‘भारतीय वायुदलाच्या इन्फिनिटी’ ड्रोनचे डिझाइन बनवण्यात आले आहे. हे सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन असेल व भारताच्या मानवरहित ड्रोन युद्ध कार्यक्रमामधील महत्त्वाचा भाग आहे.
अति उंचावरुन उड्डाण करण्यासाठी स्वदेशी बनावटीचे ड्रोन विकसित करण्यात येत आहे. ‘इन्फिनिटी’ असे या मेड इन इंडिया ड्रोनचे नाव आहे. ‘इन्फिनिटी’ ड्रोन विकसित करण्याच्या कार्यक्रमात बऱ्यापैकी प्रगती झाली आहे. भारतीय सैन्य दलात पुढच्या तीन ते पाच वर्षात या ड्रोनचा समावेश होऊ शकतो.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बंगळुरुमधील स्टार्टअप न्यूस्पेस सोबत मिळून हे ड्रोन विकसित करत आहे. वेगवेगळे सेन्सर्स या ड्रोनमध्ये बसवण्यात आले आहेत. यामध्ये उत्कृष्ट सिंथेटिक अपर्चर रडारही आहे. शत्रुच्या प्रदेशात आत खोलवर असलेल्या लक्ष्यावर ‘इन्फिनिटी’ ड्रोनचे लक्ष असेल. अन्य ड्रोन सिस्टिमच्या माध्यमातून हवाई हल्ल्याच्या मोहिमेमध्ये ‘इन्फिनिटी’ ड्रोन समन्वय साधण्याची भूमिका पार पाडेल.
अन्य ड्रोनमधून होणाऱ्या हवाई हल्ल्याचे लाइव्ह व्हिडिओ फिड जमिनीवरील ग्राऊंड स्टेशन्सना पाठवण्यास ‘इन्फिनिटी’ ड्रोन सक्षम असेल. या टेक्नोलॉजीमुळे हवाई हल्ला कितपत यशस्वी झाला, त्याची खात्रीलायक माहिती मिळू शकेल. २०१९ मध्ये इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. त्यावेळी हवाई हल्ल्याचे लाइव्ह व्हिडिओ फिड उपलब्ध नसल्यामुळे हवाई हल्ल्याच्या यशाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. फक्त लष्करी मोहिमांमध्येच नव्हे, तर आपत्ती व्यवस्थापन,स्मार्ट सिटी आणि नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनातही ‘इन्फिनिटी’ ड्रोनची मदत होईल, असे हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून सांगण्यात आले.