मुंबई: वृत्तसंस्था । राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे.
नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना २० हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचं सांगितलं जातं.
एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून २०० किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे झालेले आरोप ताजे असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकापाठोपाठ एक अशा दोन प्रकरणात अडकल्याने राष्ट्रवादीवर राजकीय संक्रात ओढावल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडेच राज्याचे गृहखाते असल्याने या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काय कारवाई करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे