माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वृत्तपत्रविक्रेता दिन” म्हणून साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ” वृत्तपत्रविक्रेता दिन ” म्हणून शनिवार दि. १५  ऑक्टोबर  रोजी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते प्रकाश वराडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

 

कार्यक्रमास प्रमुख अतिथी वृत्तपत्र विक्रेते योगेश वाणी, बी. व्ही.जगताप, दगडू शिंपी, प्रकाश वराडे, निलेश जगताप, युवराज माळी ( प्रकाशक, अथर्व प्रकाशन ),  संगीता माळी ( प्रकाशिका,कुमुद प्रकाशन ) मान्यवर उपस्थित होते. यावेळी ” वृत्तपत्रांचे अंधारातील गठ्ठे हाच आमचा जीवनदायी सूर्य ” असे  ज्येष्ठ  वृत्तपत्र विक्रेता संतोष शेळके यांनी सांगितले. त्यांनी पुढील मार्गदर्शनात  वृत्तपत्र वाटपातील कटू गोड प्रसंग मांडलेत.

 

आईच्या स्मृतिदिनानिमित्त सुनिल दाभाडे यांचे ग्रंथदान

वाचनप्रेरणा दिनाच्या औचित्याने मातोश्री देवकाबाई दाभाडे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी वृत्तपत्र वाटप करीत शिक्षण घेणाऱ्या ध्येयवादी ३५ विद्यार्थ्यांना प्रेरणादायी चरित्र पुस्तकांचे ग्रंथदान केले.  ग्रंथ भेट प्रकाशक युवराज माळी, कलाशिक्षक सुनिल दाभाडे,प्रकाश वराडे, निलेश जगताप ,पुस्तक भिशी जिल्हाप्रमुख विजय लुल्हे , दगडू शिंपी, योगेश वाणी यांच्या हस्ते ग्रंथाचे वितरण करण्यात आले.ग्रंथदानाची प्रेरणा पिताश्री न्हानू दाभाडे,निवृत्त शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड ,ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर,निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी दिली.

ग्रंथदानानंतर प्रकाशिका संगिता माळी यांनी वाचन प्रेरणादिनानिमित्त उपस्थितांना दर्जेदार निरंतर ग्रंथवाचन व वाचन संस्कृती संवर्धन करण्यास कटीबद्ध राहू याबाबत सामुहिक प्रतिज्ञा दिली.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने वाचनाचे महत्व सांगितले.

युवराज माळी यांनी  देवकाईच्या स्मृतिदिनानिमित्त कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी संघर्ष करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकांची भेट देऊन सन्मान केल्याबद्दल दाभाडे यांचे कौतुक केले. प्रायोजक सुनील दाभाडे यांनी वृत्तपत्र विक्रेत्या विद्यार्थ्यांच्या ध्येयवाद, आर्थिक संघर्ष आणि आत्मसन्मानाच्या मूल्यात्मक लढाई प्रौढांनाही प्रेरणादायी असल्याचे  सांगितले.   हेमंत शिरसाठ याने वृत्तपत्र विक्रेत्या विद्यार्थ्यांतर्फे प्रतिनिधिक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रकाश वराडे म्हणाले, ” डॉ. कलाम यांनी ८ व्या वर्षी केलेले वृत्तपत्र वाटपाचे काम आम्हाला दिपस्तंभाप्रमाणे क्षणोक्षणी प्रेरणा देते. वेळेची शिस्त,आज्ञाधारकपणा, संयम, धार्मिक एकता आणि स्वावलंबनातून शिक्षणाची अदम्य जिद्द आणि समर्पित राष्ट्रसेवा हा कलाम साहेबांचा जीवन संदेश आम्हाला रोज जगण्याला चैतन्य देतो. कलामांची जीवनमूल्ये हिवाळा व पावसाळा ऋतुत आमची कवच कुंडली आहेत. म्हणूनच आम्ही वाचकांना कडाक्याच्या थंडीत व भर पावसात पेपर वेळेत पोहचवण्याचे दिव्य पार पाडू शकतो.

कार्यक्रमास पूर्वेश माळी,पवन शिखरे, प्रशांत पाटील, वैभव कोष्टी , कृष्णा तिवारी, हेमंत शिरसाठ ,चैतन्य शेळके,नयन पाटील, हितेश पाटील,धनंजय पाटील, दीपक पांडे , गुंजन जगताप, हर्षल निंभोरकर आदी वृत्तपत्र वाटप करणारे विद्यार्थी यांचेसह कुमूद माळी व वेध माळी उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिमा पूजनास फाटा देऊन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम लिखित पुस्तकांचे ग्रंथ पूजन अर्थात प्रतिभा पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कार्यवाहक विजय लुल्हे व आभार संयोजक सुनिल दाभाडे यांनी मानले.

 

Protected Content