नांदेड वृत्तसंस्था । ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. फेसबुकच्या माध्यमातून भावनिक पोस्ट लिहून सूर्यकांता पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला. 43 वर्षांच्या राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेतली आहे.
“४३ वर्ष राजकारणात होते एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४००० हजाराच्या थाटात नेसली, मिळालेले काम मन लावून केले, आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण ? म्हणून एवढा शो करायचा” असे त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे.
सूर्यकांता पाटील सुरुवातीला काँग्रेसमध्ये होत्या, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये त्यांचे मन रमताना दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत.
पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्या ग्रामविकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले होते.
१९८० मध्ये त्या हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्या होत्या. १९८६ मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या होत्या. १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा त्या लोकसभेत खासदारपदी निवडून आल्या.
सूर्यकांता पाटील यांनी भाजपात प्रवेश करताना ‘टीव्ही9’ ला एक विशेष मुलाखत दिली होती. त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माझा केसाने गळा कापल्याचा आरोप केला होता. तूर्तास त्यांनी आपल्या राजकीय संन्यासावर काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र समाजसेवा सुरुच राहील, असे त्यांनी जाहीर केलं आहे.