पुणे । हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन अजय चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांचे आईवडील दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे जाणार्या रस्त्यावरुन दवाखान्यात निघाले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी अचानक त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीवरुन जाणार्या चड्डा यांच्या आईच्या पायाला मार लागला. याबाबत त्यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. फिर्यादीच्या वडीलांनी आपली ह्दय शस्त्रक्रिया झाली असल्याचे त्यांना सांगत होते. तरीही हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या छातीत व पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या आईलाही लाथ मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी अमन चढ्ढा यांच्या फिर्यादीवरून हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे अधिक तपास करीत आहेत.