नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील चोवीस तासांत देशभरात ३ हजार २७७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर १२७ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता ६२ हजार ९३९ वर पोहचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३२७७ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६२ हजारांच्या वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २१०० वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ४१४७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १९३५८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ४० लाखांवर गेल्याने सर्वच देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या भयावह आजाराने २ लाख ७८ हजार ८०० जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.