पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील कासली गावात महिलेचे बंद घर फोडून स्टीलच्या डब्यातील ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील कासली येथे अनिताबाई संजय महाले या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २ जानेवारी रोजी रात्री १० ते ३ जानेवारी सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान महिला घरात झोपलेले असताना युवराज शंकर पांढरे (वय 55, रा. शेरी ता.जामनेर) याने महिलेच्या घरात घुसून स्टीलच्या डब्यात ठेवलेले ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेचे दीर अनिल गजमल महाले यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी युवराज शंकर पांढरे रा. शेरी ता.जामनेर यांच्या विरोधात मंगळवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रवीण चौधरी करीत आहे.