महिलेचे बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे साधना अंकुश माळी (वय-४५) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ते ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान महिलेचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर साधना माळी यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रविवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Protected Content