पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या क्रेडिट कार्डची पैसे भरण्याची मुदत संपली आहे असे सांगून महिलेच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन पध्दतीने ७८ हजार ९०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शनीवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांकधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्योत्सना अशोक अहिरे (वय-३८) रा. आदर्श नगर, पाचोरा या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ फेब्रुवारी रोजी त्या घरी असताना दुपारी ३ वाजता त्यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आला. आणि सांगितले की, मी क्रेडिट कार्डचा अधिकारी बोलत असून तुमच्या क्रेडिट कार्डवरील रक्कम भरण्याची मुदत संपली आहे. तुमचे पैसे भरण्यासाठी जास्त व्याज लागेल असे सांगितले. त्यानुसार महिलेने सांगितले की, मला ईएमआयमध्ये पैसे भरण्याची सोय करून द्या. त्यावर समोरील व्यक्तीने सांगितले की, मी सांगेन तशी पद्धत करा, त्याने महिलेच्या मोबाईलवर एक ॲप टाकले, ते डाऊनलोड करण्याकरता सांगितले. त्यानंतर दिलेली माहिती महिलेने भरल्यानंतर महिलेच्या खात्यातून ७८ हजार ९०० रुपये ऑनलाईन परस्पर काढून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती मोरे करीत आहे.