मेलबर्न (वृत्तसंस्था) आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने आज न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपमधील हा भारताचा सलग तिसरा विजय असून सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा भारत हा पहिला संघ आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांना ठराविक अंतराने बाद करत राहिले. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला ६ चेंडूत १६ धावांची गरज होती पण शिखा पांडेने ११ धावा दिल्या आणि संघाला ४ धावांनी विजय मिळवून दिला. भारताकडून शिखा, दीप्ती, राजेश्वरी, पूनम आणि राधा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरूवात फार समाधानकारक झाली नाही. परंतू शफाली शर्मा आणि तानिया भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची अर्धशतकी भागिदारी केली. भारताच्या विकेट एका बाजूने पडत असताना शफालीने दुसरी बाजू लावून धरली होती. शफाली बाद झाली तेव्हा भारताची अवस्था १३.५ षटकात ५ बाद ९५ अशी होती. त्यानंतर २० षटकात भारताला ८ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.