अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंचलवाडी शिवारातील शेतातून महावितरण कंपनीच्या मालकीचे ट्रान्सफार्मर आणि अल्यूमिनीअमच्या तारा असा एकुण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सोमवार २० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी शिवारात असलेले नागराज हिलाल गुजर यांच्या शेताजवळ महावितरण कंपनीच्या मालकीचे ट्रान्सफार्मर आणि अल्युमिनियमच्या तारा असा ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल ठेवलेला होता. दरम्यान, १७ मार्च सायंकाळी ६ ते १८ मार्च सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शेतात ठेवलेले ट्रांसफार्मर आणि विद्युत तारा शेतातून आज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर जानवे येथील महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप आधार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. चोरी झाल्याबाबत त्यांना कुठलीही माहिती न मिळाल्यानंतर अखेर त्यांनी सोमवार २० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हितेश चिंचोरे करीत आहे.