महाविकास आघाडी सरकारवर अकार्यक्षमतेचा आरोप

 

मुंबई : वृत्तसंस्था । ”सरकार एकटे चालवू शकत नाही, शेतकऱ्यांचे दुःख दूर करू शकत नाही, महिलांना संरक्षण नाही, धर्माचे रक्षण नाही, विकास करू शकत नाही.. मग तुम्ही सत्तेत का आहात?” असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले, त्यांच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील..असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

विविध मुद्यांवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. ”करोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकारने गोंधळाची परिस्थिती केली आहे. शाळा सुरू करण्यावरून सरकारमध्ये ताळमेळ नाही. १ जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे अशी मागणी आम्ही अगोदर केलेली आहे. कोरोना काळात केंद्राने सर्व सुविधा दिल्या तरीही राज्य सरकार प्रत्येक गोष्टीचं खापर केंद्रावर फोडत आहे, राज्य सरकारने कोरोना काळात कसला खर्च केला?” असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.

”आम्ही रेशनासाठी आंदोलन केलं, मग मंदिरे उघडण्यासाठी, दूध दराबद्दल आंदोलने केली, आता वीज बिलांसदर्भातही आम्ही प्रखर आंदोलन करणार. सरकारमध्ये कोणत्याच गोष्टीचा ताळमेळ नाही, मराठा आरक्षणाबाबत एकवाक्यता नाही. पालघर साधू हत्या गुन्ह्यात स्थानिकांवर आकसातून कारवाई होत असल्याचा आरोप असून, सीआयडी ऐवजी सीबीआय तपासाची स्थानिकांची मागणी राम कदम यांनी उचलून धरली, यात चुकीचं काय आहे?” असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दिवसभर प्रामाणिकपणे काम करून रात्री सुखाने झोपायची आमची सवय आहे, त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही प्रकराची चौकशी खुशाल करावी, आम्ही त्याला घाबरत नाही.” असं आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.

Protected Content