कोल्हापूर प्रतिनिधी । सीएए आणि भीमा कोरेगाव तपासावरुन महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे, कोणत्याही प्रकारची धुसफूस वा वाद नसल्याचा निर्वाळा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. येथील आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या उदघाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापुरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय ब्राम्हण परिषदेच्या उदघाटन समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना जयंत पाटील यांना भीमा-कोरेगावप्रकरणी राज्य सरकारकडून समांतर तपास सुरु असल्याबद्दल विचारले असता पाटील यांनी समांतर चौकशीचा निर्णय अजून कागदोपत्री झालेला नाही. झाला असेल तर त्याची मला कांही कल्पना नाही, असे सांगत यापासून अनभिज्ञ असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही. मतभेद तर अजिबात नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले काम करत आहोत, असे स्पष्ट करुन पाटील यांनी सरकार भक्कम असल्याचाही निर्वाळा दिला. नवाब मलिक यांच्याबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर कुणी घोषणा दिली अथवा नाही दिली, यापेक्षा आमच्या पक्षाची भूमिका ठरली आहे, त्यात कधीही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.