नवी मुंबई प्रतिनिधी । राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक पध्दतीत एकत्र आले असून ते टिकणार नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. ते येथे आोजित केलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलत होते.
नवी मुंबईमध्ये कालपासून भाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू झाले आहे. यात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मार्गदर्शन करतांना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी एक अवास्तव आणि अनैसर्गिक आहे. हे अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. त्यामुळे भाजपाला संधी प्राप्त झाली असून पूर्ण ताकदीने आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे सांगत करत भविष्यात महाराष्ट्रात भाजपाची स्वबळावर सत्ता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. मात्र, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यासाठी वचनबद्ध आहोत, असेही जे. पी. नड्डा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. ३७० कलममुळे फुटीरवाद्यांना बळ मिळत होते, अतिरेकी गतिविधी होत होत्या. जम्मू काश्मीरमध्ये आता देशातील कायद्यांची अंमलबजावणी होईल. तसेच, जम्मू काश्मीर बँकेची सुद्धा चौकशी होईल आणि ज्यांनी भ्रष्टाचार केले आहेत, ते जेलमध्ये जातील असा इशारासुध्दा नड्डा यांनी दिला.