जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा, ममुराबाद आणि थोरगव्हाण या गावातील बेघर असलेल्या कुटुंबांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने सोमवारी २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील आसोदा, ममुराबाद आणि थोरगव्हाण या गावात राहणाऱ्या बेघर लाभार्थ्यांनी वेळोवेळी शासनाकडे निवेदनाद्वारे निवासी प्रयोजनासाठी शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करून बेघर कुटुंबाला जागा देवून न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली होती. या संदर्भात संबंधित विभागाकडे सर्व कागदपत्रे दाखल करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांनी १३० कुटुंबांना ५०० चौरस फूट जागा वाटप करण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची निवड केली आहे. परंतु अद्यापपर्यंत बेघर झालेल्या कुटुंबांना कुठलीही जागी संदर्भात कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे १३० कुटुंबांना जागा उपलब्ध करून द्यावी, नमुना नंबर ८ चे उतारे मालकी हक्काचे नावे करून द्यावे, घर बांधकामासाठी ३ लाख रुपये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने आणि बेघर कुटुंब असलेले लाभार्थ्यांनी सोमवारी २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा देखील पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. या प्रसंगी गोकुळ कोळी, रजूबाईकोळी, कलाबाई कोळी, वंदना सपकाळे, विजया जोहरे, रंजना कोळी, मंगला कोळी, वैशाली कोळी, अनिल कोळी, विठ्ठल कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते.