यावल, प्रतिनिधी | येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोरोना काळात भुसावळ विभागातून बंद करण्यात आलेली रेल्वे पॅसेंजर सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणीला यश आले आहे. भुसावळ विभागातून पॅसेंजर रेल्वेगाडया पूर्ववत धावणार असल्याचे रेल्वेने मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांना पत्राद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २९ ऑक्टोबर रोजी भुसावळ विभागाचे रेल्वे महाप्रबंधक एस. एस. केडीया यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. यावेळी अनेक दिवसापासुन भुसावळच्या रेल्वे स्थानकातुन सुटणाऱ्या जवळपास सर्व पॅसेंजर रेल्वेगाडया बंद झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांसह जळगाव जिल्ह्यातील हजारो नोकरी निमित्ताने ये जा करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. समाजभावनेचा आदर करून, कोरोना संसर्गाचा प्रार्दूभाव अंतीम टप्यात आल्याने व सामान्य परिस्थिती निर्माण झाल्याने भुसावळ विभागातील रेल्वे गाडया पुर्वरत सुरू करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, भुसावळ शहर अध्यक्ष विनोद पाठक व इतर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने महाप्रबंधक एस. एस. केडीया यांना दिले होते. मनसेच्या मागणीला प्रतिसाद देत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ नाशिक पॅसेंजर, भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस, भुसावळ मुंबई पॅसेजर आणि भुसावळ सुरत पॅसेंजर रेल्वे गाडया सुरू करण्यात येत असल्याचे माहीती पत्र मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांना पाठविले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे जळगाव ग्रामीण क्षेत्रातील राहणाऱ्या जिल्ह्णातील शेकडो प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागल्याने मनसे कौत्तुक करण्यात येत आहे.