फेरबदलानंतरही काँग्रेसमध्ये असंतोष

दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षात मोठा संघटनात्मक बदल केला. यासाठी पक्षात दीर्घकाळापासून मागणी होत होती. काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून बदल आणि पक्षासाठी कायमस्वरूपी अध्यक्ष निवडीबाबत मागणी केली होती. शनिवारी पक्षात काही महत्वाचे बदल तर झाले, मात्र पत्र लिहिणारे ज्येष्ठ नेते संतुष्ट नाहीत.

नेतृत्व बदल करण्याची मागणी करणारे बहुतेक नेते काँग्रेसमधील या बदलामुळे नाराज झाले आहेत. पक्षात केलेल्या या फेरबदलांशी काँग्रेस नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रातील चिंतेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. हा फेरबदल निराशाजनक असून आम्ही यामुळे नाराज असल्याचेही हा नेता म्हणाला. यात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून पक्षाच्या पुनरुद्धारासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसस नसल्याचे हा नेता म्हणाला.

पक्षात करण्यात आलेला फेरबदल हा एक निरर्थक प्रयत्न असल्याचे पत्र लिहिणाऱ्या ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे. शनिवारी पक्षाच्या बैठकीत अनेक नवे लोक सहभागी झाले होते आणि यावरूनच याचा अंदाज लावता येतो, असेही हा नेता म्हणाला. फेरबदलामुळे असंतुष्ट असलेल्या आणि पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस कार्यकारी समिती ही काँग्रेस पक्षात निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.

काँग्रेस पक्षाने केलेल्या संघटनात्मक फेरबदलात पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची छाप स्पष्टपणे दिसत आहे. गांधींच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले आहे. कार्यकारी समितीच्या नव्या टीममध्ये राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांचा भरणा आहे. गुलामनबी आझाद आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनाही काँग्रेस कार्यकारी समितीत मात्र कायम ठेवण्यात आले आहे. या फेरबदलांमुळे नाराज झालेल्या ज्येष्ठ नेत्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधीकडे आपली बाजू मांडण्याचे ठरवले आहे.

Protected Content