महाराष्ट्र कन्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | “आधुनिक काळात बोली भाषा टिकणे गरजेचे आहे, पुस्तकांच्या माध्यमातून बोलीभाषा जीवंत ठेवल्या पाहिजेत. त्या देशभरात पोहचल्या पाहिजेत अन्यथा त्या मृतअवस्थेत पडतील”, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.राजन वेळूकर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले.

महाराष्ट्र कन्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनावरील आशिष सोसे लिखित मराठी ग्रंथाच्या एकूण 24 भाषा आणि बोलीतील भाषांतरित पुस्तके, दोन लिपीतील लेखन आणि नाट्यरूपांतर अशा एकूण 28 पुस्तकांचे एकत्रित भव्य दिव्य असा प्रकाशन सोहळा ठाणे येथील बेडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रतिभाताई पाटील यांचे चरित्र कमी शब्दात लिहिणे कठीण आहे.अनेक भाषांत अनुवाद झाल्याने याची नोंद जागतिक पातळीवर नक्कीच होईल असेही डॉ. वेळूकर यांनी सांगितले.

माजी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्याबद्दलचे अनेक अनुभव सांगितले.त्यांच्या आठवणी उलगताना या पुस्तकाचा प्रवास कथन केला. विख्यात साहित्यिका डॉ.प्रतिमा इंगोले म्हणाल्या, ‘ बोलीभाषा संपत चालली आहे. ती नाकारली की ती संपणारच आहे ‘,अशी नाराजी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या की त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत.राजकारणात आणि स्रियांबद्दल मागवून चांगले बोलले जात नाहीत,परंतू प्रतिभाताई पाटील त्याला अपवाद आहेत.त्यांच्याबद्दल मागेही चांगलेच बोलतात. जीवनात त्यांनी सामाजिक आत्मभान चांगले जपले आहे. लेखक सोसे,प्रकाशिका संगीता चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान मिलिंद सोनार, कलावंत तुषार वाघुळदे,विश्वास मोहिते,गुरुप्रसाद बर्वे,अशोक हेमणे,श्रीकांत चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात येऊन अनुवादित लेखकांचा गौरव करण्यात आला. लेवा गणबोलीत सुरेश यशवंत यांनी अनुवाद केला,त्यांच्यावतीने अभ्यासक तसेच या भाषेचे जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न करणारे व लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव,पत्रकार तुषार वाघुळदे यांनी सत्कार स्वीकारला.आणि मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखिका माधवी घारपुरे, प्रा.मेधा सोमण,सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका वासंती वर्तक,” कुटुंब रंगलंय काव्यात ” चे कलावंत प्रा.वि.सू. बापट आदी उपस्थित होते.

सदर ग्रंथ हा मोडी लिपी, ब्रेल, लॅटिन, लिपी ,ऑडिओ रूपांतर, नाट्यरूपांतर तसेच जर्मन -प्रीती भार्गव, इंग्रजी -हेमांगी कडू,हिंदी- श्रुती गुप्ता, गुजराती-रुची दीक्षित, संस्कृत -समीरा गुजर ,कन्नड- शोभा देवाडिगा,उर्दू- शेख इश्तियाक अहेमद, अजीज अहेमद, तमिळ- व्ही.चित्रा,संथाली- विश्वनाथ तूडू, कोंकणी-दीपिका आरोंदेकर, अहिराणी-डॉ.रमेश सुर्यवंशी,झाडी-डॉ.हरिश्चंद्र बोरकर, मारवाडी-माया धुप्पड, वऱ्हाडी-राहुल भगत,मालवणी-सूर्यकांत राऊळ,हलबी- दीपक माहितकर,तडवी -अजीज तडवी , लेवागणबोली-सुरेश यशवंत, बंजारा- विष्णू राठोड, पारधी- पी.बी.सोनवणे, भिल्लोरी-पुष्पा गावित, कैकाडी-चंद्रकला गायकवाड, मावची- माहेश्वरी गावित, भोजपुरी- ज्ञानप्रकाश आर्य इत्यादी बोली भाषेतून भाषांतरित करण्यात आला आहे.

व्यासपीठावर पाणिनी प्रकाशनच्या संगीता चव्हाण,लेखक आतिष सोसे यांचीही उपस्थिती होती. सलग तेरा वर्षांच्या अथक प्रयत्नांनी हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता चौधरी यांनी केले.

कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक भागातून विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

Protected Content