मुंबई (वृत्तसंस्था) सरकारबद्दल कुणाला काही म्हणायचे आहे ते म्हणू दे, मला महाराष्ट्राची माहिती आहे. महाराष्ट्रात मध्यप्रदेशसारखी स्थिती ओढवणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार यांनी आज विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सरकार पाडण्याबाबत उलटसुलट चर्चा व प्रयत्न होतो आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर पवार म्हणाले की, शिमगा नुकताच संपला आहे. त्यामुळे अजुन कुठला मुहूर्त विरोधकांना शिल्लक राहिलेला नाही, असे मला वाटते, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे सक्षम आहेत. त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. मात्र, मध्यप्रदेश सरकारबाबत साशंकता आहे. कमलनाथ काही करतील का? हे पाहावे लागेल, असे सांगतानाच काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच काँग्रेसमध्ये नेतृत्व, कर्तृत्व आणि भविष्यही असल्याचेही त्यांनी सांगितले.