मुंबई : वृत्तसंस्था । दिल्ली सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. महाराष्ट्रातही दुसरी लाट येण्याची भीती आहे.दोन दिवसांत राज्यातील रुग्णांच्या संख्येतही चिंताजनक वाढ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे.
“राज्य सरकारनं खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात दुसरी लाट आली, तर ती सगळ्यांना महागात पडेल. राज्यात लाट येऊ नये असं वाटतं, पण मनात भीती आहे,” अशा शब्दात राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे.
रत्नागिरीत राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा,” असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.
“ मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा सुरु होत असताना मुलांची सुरक्षा महत्वाची आहे. शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी शिक्षकांना जे शक्य असेल ते त्यांनी करावं. नाहीतर एखाद्याला कंत्राट देऊन शाळांचं निर्जंतुकीकरण करावं,” अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
“राज्यात सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी राज्य सरकारनं दिलेली आहे. मात्र, आता लग्नासाठी उपस्थिती संख्या वाढवण्याचे संकेतही टोपे यांनी दिले आहेत. असंही राजेश टोपे म्हणाले.