पुणे : वृत्तसंस्था । महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुण्यात असल्याचे सांगून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
शरद पवार हे अनुभवी नेते असल्यामुळे त्यांचा सल्ला घेतला तर पोट दुखी होण्याचे काही एक कारण नसल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला देखील लगावला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुणे येथील पत्रकार परिषदेत जोरदार राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले की शरद पवार हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एक अत्यंत अनुभवी नेते आहेत यामुळे त्यांचा सल्ला घेऊन जर राज्य चालत असेल तर यामुळे कोणाला पोट दुखी होण्याचे काहीही कारण नाही. कारण पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील अनेक नेते हे पवारांचा सल्ला घेत असतात. यामुळे पवार हे एक मोठे नेते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू हा याआधी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने मुंबईत होता. मात्र आता शरद पवार यांच्या माध्यमातून हा केंद्रबिंदू पुण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीवर ती भाष्य केले. ते म्हणाले की बिहारच्या निवडणुकीकडे देशातच नव्हे तर जगाचे लक्ष लागलेले आहे. तेजस्वी यादव यांना ज्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. याचा विचार केला असता तेथे सत्तांतर झाल्यास आणि यादव हे मुख्यमंत्री झाल्यास नवल वाटता कामा नये असे प्रतिपादन राऊत यांनी केले. तर राज्यपालांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी राजभवनाच्या बाहेर यावे. आम्ही राजकारण करण्यासाठी तयार असल्याचे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले.