महाराष्ट्रातील चहावाल्याची मोदींना १०० रुपयांची मनी ऑर्डर

 

पुणे : वृत्तसंस्था । बारामतीतील एका चहावाल्याने पंतप्रधान मोदींना १०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवली असून दाढी करुन घ्या, तुम्हाला खूप निर्णय घ्यायेच असल्याने तुम्ही टापटीप राहणं आवश्यक असल्याचंही म्हटलं आहे.

 

भारतातील कोरोना संकटामुळे अनेकांना दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत असतानाच पंतप्रधान म्हणून तुम्ही डोक्यावरील केस आणि तोंडावरील दाढी वाढवून काय सिद्ध करु पाहताय?, असा थेट सवाल बारामतीमधील एका चहावाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

सध्या सोशल नेटवर्किंगवर हे पत्र व्हायरल झालं आहे.

 

अती महत्वाचे म्हणत २७ मे रोजी हे पत्र पाठवण्यात आलं असलं तरी सध्या ते सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे. मोदींना पाठवलेल्या या पत्राचा विषय ‘आपली दाढी कटिंग करण्यासंदर्भात आर्थिक मदत मनी ऑर्डरबाबत’, असा आहे. हे पत्र अनिल मोरे यांनी पाठवलं आहे. अनिल मोरे यांची स्वत:ची चहाची टपरी आहे. अनिल हे बारामतीमधील इंदापूर रोडवरील सुहास नगर येथील रहिवाशी आहेत.

 

मार्च २०२० ते आजपर्यंत म्हणजेच २७ मे २०२१ पर्यंत भारतामधील विविध राज्यांमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये तसेच शहरी, ग्रामीण भागांमध्ये १५ महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे रोगराई पसरली आहे. या राष्ट्रीय संकटाच्या कालावधीमध्य केंद्र सरकार व राज्य सरकारकडे ठोस नियोजन नसल्याने लोकांना लॉकडाउनच्या नावाखाली भिकारी बनवून लोकांचे रोजगार उत्पन्न साधने नाहीशी केली आहेत. अक्षरश: सर्वोत्परी भारतीयांना देशोधडीला लावले आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आलीय. लोकांना जगण्यासाठी देनंदिन अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी औषधोपचारांसाठी, राशनपाण्यासाठी, लाईट बिल, विविध शासन, प्रशासनाचे कर भरण्यासाठील लोकांकडे छदामही उरलेलं नाही. मदत पूर्णपणे केली जात नसून सरकारकडून सर्वसामान्यांना मदतही केली जात नाहीय. भारतीयांची अवस्था अत्यंत बिकट बनवून आपण दाढीचे केस वाढवून काय सिद्ध करु पाहताय?, असा प्रश्न मोरे यांनी या पत्रातून मोदींना विचारलाय.

 

वाढायचे असतील तर सरसकट मोफत दवा उपचाराकरता केली जाणारी मदत, मोफत सरसकट लसीकरण, दवाखन्यांची संख्या, औषधोपचारांची गुणवत्ता वाढवा. सर्व भारतीयांची विद्युत बील, ज्यामध्ये आजवरची आणि थकीत बिलांचा समावेश असेल अशी सर्व रद्द करुन २०२२ पर्यंतची बिलं सरसकट माफ करा. लोकांना मोफत घरपोच सर्व अत्यावश्यक सेवा सुविधा, जिन्नस वस्तू पुरवा. ज्यांनी नातेवाईक गमावलेत त्या प्रत्येक घराला पाच लाखांची मदत करा. सर्व भारतीयांना सरसकट सर्व करांची माफी द्या. पुढील दोन वर्षांसाठी सूट देऊन करमाफी करा. लोकांना सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य द्या. बिनव्याजी दिर्घ मुदतीचा वित्तपुरवठा करणारी कर्जे उपलब्ध करुन लोकांना आत्मनिर्भर होण्यासाठी बळ द्या, अशी मागणीही मोरेंनी पत्रातून केलीय.

 

शासन, प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाची गुणवत्ता वाढवा. लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांना मदत करा. कुणाचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, महागाई नियंत्रणात राहील आणि जिवनावश्यक वस्तूंच्या, इंधनाच्या किंमती कमी करा. औषधांचा काळा बाजार थांबवा, सर्व वैद्यकीय उपचार सेवा सर्व गटातील लोकांना मोफत द्या. सर्व ठिकाणची नोकरभरती करुन सर्व पदे भरुन द्या. सातत्याने लॉकडाउन असाच सारखा सारखा वाढत राहिला तर देशात, राज्यात, जिल्ह्यात तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील लोक उत्पन्नापासून वंचित असल्याने चुकीच्या मार्गाकडे वळतील. चोरी, लुटमार, हिंसकपणे बेकायदेशीर वागण्याचे प्रमाण वाढून अराजकता माजेल. लोकांचा त्रास कमी करा. योजनांची संख्या वाढवा. डोक्यावरचे केस व तोंडावरची दाढी वाढवून साधूसारखी वेशभूषा करुन काही साध्य होणार नाही, असं या पत्रामधून मोरेंनी मोदींना सांगितलं आहे.

 

आपण जबाबादर प्रथम नागरिक आहात आपल्यावर सर्वांची जबाबदारी आहे. राजकारण, बनवेगिरी सोडून तुम्ही आधी दाढी कटिंग करा. तुमचं व्यवस्थित टापटीप राहणे महत्वाचे आहे. तुम्हाला जनउपयोगी असंख्य महत्वाचे निर्णय़ घ्यायचे आहेत. मार्ग काढायचे आहेत. सर्व भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे आपले पूर्णपणे जाणून बुजून दुर्लक्ष होत व केले जात आहे. सदर बाब अंत्यत गंभीर आहे. तुम्ही चहावाले होता. मी सुद्धा चहावाला आहे. म्हणून माझ्याकडून मी माझ्या कष्टाची कमाई म्हणजेच १०० रुपये आपणास पाठवत आहे. दाढी करुन घ्या. मी एक भारतीय या नात्याने आपल्याला विनंती करतो की भारतीयांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा, असं पत्राच्या शेवटी मोरेंनी म्हटलं आहे. मोरे हे रिपब्लिकन युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष असल्याचा उल्लेख पत्राच्या शेवटी आहे.

 

Protected Content