मुंबई : वृत्तसंस्था । सोनिया गांधी व शरद पवार यांच्यासह देशातील विरोधी नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं. या पत्रानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. काही मुद्द्यांवर भाष्य करीत “यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?,” असं प्रश्नही उपस्थित केला आहे.
फडणवीस म्हणाले, “अगदी १३ मे रोजीच्या आकडेवारीचा विचार केला, तरी देशातील रूग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण २२ टक्के आहे, जे सातत्याने ३० टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ३१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण सुद्धा १४ टक्के आहे. त्यामुळे देशातील स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील लढा अधिक ताकदीने लढता येईल, याच्याशी आपण सहमत असालच. आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहे, ज्यात १.८० कोटी वॅक्सिन्स, ८ लाखांहून अधिक रेमडेसिवीर, १७५० मेट्रिक टन ऑक्सिजन, कितीतरी व्हेंटिलेटर्स, बायपॅप आणि ऑक्सिजन काँन्सट्रेंटर्सचा समावेश आहे. असं असलं तरी काही लोकांना मोदींवर टीका करणे, हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य वाटते,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असं वाटतं. आता समजा मुंबईची स्थिती पाहिली तरी येथे चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटीजेनचे प्रमाण अधिक ठेऊन एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले. मृत्यू मोठ्या प्रमाणात लपविले जात आहेत. अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या वर्गवारीचे राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण ०.८ टक्के असताना एकट्या मुंबईत ते ४० टक्के आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी ८८ हजार मृत्यू होतात. पण, २०२० या वर्षांत यात २०,७१९ मृत्यू वाढले. यातील ११,११६ मृत्यू केवळ करोनाचे दाखविले. म्हणजे प्रत्यक्षात ९,६०३ करोना मृत्यू दडविले. गेल्यावर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहे. आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? आजही अंत्यसंस्कारांसाठी वेटिंग पिरिएड आहे. देशात दररोज ४,००० मृत्यू कोरोनामुळे नोंदले जात असताना त्यातील ८५० हे महाराष्ट्रातील आहेत आणि सरकार आपले कौतुक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना देवाच्या आधारावर सोडून देण्यात आले आहे. ग्रामीण भागात बेड्स नाहीत, उपचार नाहीत, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहे. शेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करीत आदेश द्यावे लागले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात संसर्ग आणि मृत्यूची स्थिती अतिशय वाईट आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारीत सरकारी डॉक्टर पकडले जातात, तर त्यांचा पीसीआर सुद्धा मागितला जात नाही, अशी स्थिती आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“कधीकधी लॉकडाऊन हा उपाय असतो, पण असं करताना गरीब, उपेक्षित, शेतकरी यांना पॅकेज देणं अपेक्षित असते. अनेक छोटी राज्य मदत देत असताना महाराष्ट्रात मात्र अर्थसंकल्पीय आकड्यांची पॅकेजमध्ये बनवाबनवी करण्यात आली आहे. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी समाजमाध्यमांचे टेंडर जारी केले जातात, पण गरिबांना मदत मिळत नाही. असं असताना सुद्धा आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. संकटात सूचना करणे हे विरोधी पक्षाचे कामच असते. पण, नकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणे आवश्यक असतं. केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसची किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यांनी चालणार्या सरकारांना सुद्धा सल्ला देणं हे काम सुद्धा आपण (सोनिया गांधी) केले पाहिजे. आज संपूर्ण जग मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहते आहे. त्यामुळे जगातील अनेक देश मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. भारतीय वॅक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करताना दिसून येतो. खरे तर वॅक्सिनचे उत्पादन वाढते आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात २०० कोटी वॅक्सिन उपलब्ध होणार आहेत. अर्थात भारतीय वॅक्सिनबाबतीत काँग्रेसचा विश्वास वाढतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल,” असं म्हणत ‘ये पब्लिक है, सब जानती है’, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.