महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले लक्ष

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत छोडो आंदोलनाचा इतिहास जिवंत करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ आज राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरला.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सेरियल रामफोसा यांच्या सह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आज राजपथावर ७० वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला. यावर्षीच्या पथसंचलनात सेनेचे अश्‍वदल, रणगाडे, ब्रम्होस मिसाईल, स्वाती रडार, युद्ध टँक, आकाश मिसाईल, लष्कर, नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन आणि बँड पथके उपस्थितांचे आकर्षण ठरले.

वंदे मातरम.. या राष्ट्रगाणाची धून आणि करेंगे या मरेंगे, भारत छोडो अशा घोषणांच्या निनादात भारत छोडो आंदोलनावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने राजपथावर उपस्थितांनी मने जिंकली. चित्ररथाच्या पुढील भागात दृढनिश्‍चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारा व भारत छोडोची घोषणा देणारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मोठी प्रतिमा सर्वांचे आकर्षण ठरली. चित्ररथाच्या मध्यभागी एकतेचे प्रतीक असणारा चरखा व चित्ररथाच्या शेवटच्या भागात मुंबईची खास ओळख गेट वे ऑफ इंडिया ची प्रतिकृतीही लक्षवेधी ठरले. चित्ररथावर कलाकारांनी घोषणा देणारे स्वातंत्र्यसैनिक व इंग्रज पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिका साकारल्या .

दरम्यान, औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचा कॅडेट सागर मुगले याने राजपथावरील १४४ सदस्यीय एनसीसी पथकाचे नेतृत्व केले. राज्यातील २२ कॅडेट्स पथसंचलनात सहभागी झाले. पुणे येथील सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींगचा विद्यार्थी दर्पेश डिंगर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व केले. राज्यातील एनएसएसच्या १४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या पथसंचलनात सहभाग घेतला.

पथ संचलनात प्रधानमंत्री बाल पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील एंजल देवकुळे आणि तृप्तराज पंड्याही पथ संचलनात सहभागी झाले. तसेच नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात संगीताच्या प्राध्यापिका डॉ. नाफडे यांनी भारतीय लष्करासाठी संगीतबद्ध केलेली शंखनाद ही पहिली मार्शल धून आज राजपथावर वाजली. आजपासून प्रथमच भारतीय मार्शल धून वाजण्याची पंरपरा सुरु झाली आहे.

Add Comment

Protected Content