महामार्गावर टोळींकडून होणाऱ्या हल्ल्यांप्रकरणी ट्रक असोसिएशनचे एसपींना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालकांना टोळीकडून मारहाण करुन लुटल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमिवर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून गस्त घालावी अशी मागणी जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगांव शहराच्या नशिराबाद हद्दीपासुन ते बांभोरीपर्यंत मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकांना अडवुन, हुज्जत घालुन, मारहाण करून पैसे हिसकवणारी टोळी कार्यरत आहे. २६ ऑक्टोंबर रोजी महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपाजवळ ट्रकचालकाला मारहाण करुन लुटण्याची घटना ताजी असून याप्रकरणी तालुका पोलिसांना आरोपींना अटक केली आहे. घटना घडल्यावर काही ट्रकचालक हे दुसर्‍या राज्यातील असल्याने पोलीसांचे शुक्लकाष्ट मागे लागु नये म्हणून तक्रार करीत नाही. काही स्थानिक ट्रकचालक तक्रार करायला पुढे येतात, मात्र स्थानिक पोलीस कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता ट्रकचालकांना दमदाटी करतात व त्यांच्यावरच खोटे नाटे आरोप लावतात. तसेच शहरातील वाहतूक पोलीस ट्रकचालकांना विनाकारण थांबवुन त्रास देतात. लुटीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमिवर रस्त्यावर रात्रीचे पेट्रोलिंग वाहन सुरू करावे. तसेच नशिराबाद, एमआयडीसी, जिल्हापेठ व तालुका पोलीस स्टेशनला याबाबत सुचना द्याव्यात, वाहतूक पोलिसांचाही त्रास कमी करण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सैय्यद शाहीद सैय्यद शब्बीर यांच्यासह सैय्यद अशफाक सैय्यद निसार हसीन , रशिद खान बेगवाला शरद शांताराम चव्हाण, संजय भगवान वाघ, कल्पेश छाजेड , वसीम अहेमद व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content