जामनेर, प्रतिनिधी । महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १२९ व्या जयंती दिनानिमित्त तालुक्यासह शहरातील विविध विभागातील शासकीय कार्यालये व संघटनांंच्या वतीने अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
जामनेर पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून अभिवादन केले. यावेळी पोलिस कर्मचारी सुनील माळी, निलेश घुगे आदी कर्मचारी यावेळी हजर होते. कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव पसरू नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जामनेरकरांनी शहरासह तालुक्यात सार्वजनिक कार्यक्रम न घेता आपापल्या घरी वैयक्तीकरित्या महामानवाला अभिवादन करून अगदी साध्या पद्धतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भिमनगरमधील लुंंम्बीनी बुद्ध विहारात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पहाडु सुरवाडे, मन्साराम इंगळे, वसंत सुरवाडे आदीसह सोशल डिस्टन्स पाळून मानवंदनेला उपस्थित होते.