महापौर ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; शहरात धावू लागल्या घंटागाड्या !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कचर्‍यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना आज पहाटेपासून महापौर भारतीताई सोनवणे आणि त्यांचे पती कैलास सोनवणे यांनी आपत्कालीन उपाययोजना करून शहरात घंटागाड्या पाठवल्या आहेत.

जळगाव शहरातील कचर्‍यावरून आता राजकारण पेटले आहे. वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा नेता आणि त्यांच्या समर्थकांना मलीदा मिळाल्याचा विरोधकांचा आरोप असून भाजपने मात्र हे आरोप कालच पत्रकार परिषद घेऊन फेटाळले आहेत. तर याच पत्रकार परिषदेत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी येत्या पाच दिवसांमध्येच शहरात फरक दिसेल अशी ग्वाही दिली होती. या अनुषंगाने आज पहाटे पाच वाजेपासूनच ते स्वत: आणि महापौर भारतीताई यांनी फिरून घंटागाड्या सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी सकाळीच सातच्या सुमारास वॉटरग्रेस कंपनीच्या कार्यालयात भेट दिली असता तेथे कुलुप लावल्याचे दिसून आले. या कार्यालयाच्या चाव्या मिळवून त्यांनी संबंधीत कर्मचार्‍याकडून घंटागाडीच्या चाव्या घेतल्या. यानंतर चालकांना बोलावण्यात आले. यामुळे आज सकाळी शहरात एकूण ६४ घंटागाड्या कचरा संकलन करण्यासाठी पाठविण्यात आल्या. यासोबत ट्रॅक्टर व ट्रकसारखी वाहनेदेखील पाठविण्यात आली आहेत. अर्थात, आज अनेक दिवसांनंतर घंटागाड्या आल्याने जळगावकरांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

आज सकाळपासूनच महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, भरत सपकाळे, किशोर चौधरी, प्रशांत नाईक, चेतन संकत, उपयुक्त मिनीनाथ दंडवते, आरोग्य अधिकारी पवन पाटील, आरोग्य निरीक्षक अत्तरदे आणि कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. याच प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये घंटागाड्या नियमितपणे आल्यास शहरातील कचराकोंडी सुटण्याची शक्यता आहे. यामुळे जळगावकरांनी यात सातत्य असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Protected Content