महापौरांनी जोशी पेठ परिसर करून घेतला मनपा प्रशासनाच्या मदतीने निर्जंतुक

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील जोशीपेठेत राहणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी रात्री ११ वाजता भेट देऊन तात्काळ परिसर निर्जंतुक करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, परिसरात नागरिकांनी गर्दी केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

जोशीपेठेत राहणाऱ्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, किशोर चौधरी, डॉ.राम रावलानी, डॉ.विजय घोलप, डॉ.संजय पाटील, शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही.डी.ससे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

परिसर केला निर्जंतुक
जोशीपेठेत नागरिक भयभीत झालेले असल्याने महापौरांनी रात्रीच परिसर निर्जंतुक करण्यासाठी मनपाचे पथक बोलाविले. संपूर्ण परिसरात रात्री सॅनिटायझेशनसाठी फवारणी करण्यात आली. दीड वाजेपर्यंत स्प्रिंकलर मशीन आणि ४ लोकांकडून हॅन्ड पंपद्वारे मोहीम राबविण्यात आली.

नागरिकांना आवाहन, पोलिसांना केले पाचारण
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर देखील परिसरात नागरिक गर्दी करीत असल्याने महापौर भारती सोनवणे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांना पाचारण केले. पोलिसांनी संपूर्ण परिसरात गस्त घालून नागरिकांना घरात पाठविले. महापौर भारती सोनवणे यांनी स्वतः परिसरात फिरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले व नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला.

परिसर केला सील, नातेवाईकांना केले क्वारंटाइन
जोशी पेठेत रुग्ण आढळून आलेल्या गल्लीसह इतर परिसर रात्रीच बॅरिकेट आणि लाकडी बांबू लावून सील करण्यात आला.  नागरिकांनी इतरत्र फिरू नये यासाठी ही पाऊले उचलण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाशी संबंधित असलेल्या ११ जणांना रात्री तपासणीकामी रुग्णालयात पाठविण्यात आले. पॉझिटिव्ह रुग्णाने ३ दिवस परिसरातील एका डॉक्टराकडे उपचार घेतले असल्याने त्यांना देखील क्वारंटाइन होण्याचे महापौरांनी सांगितले. रुग्णाच्या संपर्कात असलेल्या रात्री गच्चीवर लपून बसलेल्या ५ जणांना मंगळवारी सकाळी तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

Protected Content