महापौरांकडून पुण्याहून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत; होम क्वारंटाइन राहण्याच्या दिल्या सूचना

जळगाव, प्रतिनिधी।  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने अनेक विद्यार्थी पुणे येथे अडकले होते. शासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस उपलब्ध करून दिल्याने पुणे येथे अडकलेले ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनी रविवारी जळगावात परतले. रात्री ९.३० वाजता २ बस जळगावात पोहचल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना त्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले.

पुणे येथून आलेल्या विद्यार्थ्यांचे लाडवंजारी मंगल कार्यालय येथे स्वागत करताना नगरसेवक कैलास सोनवणे, माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख, जळगाव एस.टी.आगार स्थानक प्रमुख निलिमा बागुल, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, अनिल पगरिया आदी उपस्थित होते.

दोन बसने आले ४५ विद्यार्थी
पुणे येथे स्वारगेट स्थानकावर ४५ विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यानंतर दुपारी बस क्रमांक एमएच.१४.बीटी.४६३८ आणि एमएच.१४.बीटी.४७१७ ने विद्यार्थी जळगावसाठी रवाना झाले. रात्री ९.३० वाजता दोन्ही बसेस लाडवंजारी मंगल कार्यालय येथे पोहचल्या. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले.

महापौरांकडून विद्यार्थ्यांना सूचना
विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी सर्वांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जी.एम.फाऊंडेशन आणि निरामय सेवा संस्थेच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. सर्व विद्यार्थ्यांची जळगावात पुन्हा थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करून त्यांच्या जेवणाची व रात्री राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. जळगावात घरी १५ दिवस स्वतःला क्वारंटाइन करून घेण्याचा सल्ला महापौरांनी विद्यार्थ्यांना दिला.

Protected Content