जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दीक्षितवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळा हटविण्याचा प्रयत्न करत पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवार २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बी.जे. मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दीक्षित वाडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून स्थापन करण्यात आलेला आहे. दरम्यान जागेच्या वादावरून जागा मालकाने पोलीस बंदोबस्तात पुतळा हलविण्यात आला होता. ही बाब समाज बांधवांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन याला तीव्र विरोध करत ठिय्या आंदोलन केले होते. हातबल झालेल्या पोलीस प्रशासनाने अखेर वरिष्ठांच्या सूचनेनुसार हलवलेले पुतळे जागेवर पुन्हा स्थापन करण्यात आले होते. दरम्यान पुतळा हलविणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घेऊन त्या ठिकाणी देखील ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्या मागणीवरून रात्री उशिरापर्यंत तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळे संरक्षण समितीतर्फे मंगळवार २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बी.जे. मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, माजी महापौर तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होती.