महापालिकेत अभय योजनेअंतर्गत 98.26 कोटी रुपयांची वसुली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता जळगाव मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर शास्ती माफीची अभय योजना 5 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 पावतो लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात आजपर्यंत 89.23 कोटी रुपये निव्वळ वसुली व एकूण सूट रक्कम 9.03 कोटी असे मिळून एकूण वसुली 98.26 कोटी रुपये झालेली आहे. त्यात जिओ मोबाईल टॉवर यांनी 1.25 कोटी रुपये भरणा केलेला आहे. तर दुसरीकडे वसुलीसाठी नेमलेल्या एकूण 12 पथकांनी धडक कारवाई करत आतापर्यंत एकूण 181 नळ संयोजन बंद केलेले असून एकूण 201 मालमत्ताधारकांना जप्तीची अधिपत्रे बजावली आहेत, अशी माहिती सोमवारी २७ मार्च रोजी महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.

या अभयशास्ती योजनेस शेवटचे 5 दिवस बाकी असून अभयशास्ती योजनेस नागरिकांचा खूप प्रतिसाद लाभत आहे. ज्या थकबाकी मिळकत धारकांना जप्तीची अधीपत्र बजावण्यात आलेली आहेत त्या मालमत्ताधारकांनी 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येईल व अशा मालमत्तांवर बोजा चढवण्याची कारवाई मनपा अधिनियम अंतर्गत करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. मालमत्ता थकबाकीधारकांनी या शास्ती माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा व मनपा प्रशासनास सहकार्य करावे. असे अवाहन मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व उपायुक्त (महसूल ) गणेश चाटे यांनी केलेले आहे

Protected Content