महापालिकेचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पुन्हा महापालिकेतर्फे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.मंगळवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अचानक भेट देत पाहणी केली. डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा करून महापौरांनी आढावा घेतला.

कोविड सेंटरला पाहणी करताना महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप आदींसह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जळगाव शहरात आणि जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. रुग्णांना उपचारार्थ दाखल करून घेण्यासाठी मनपाचे कोविड केअर सेंटर पुन्हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण इमारतींची साफसफाई करून विद्युत दुरुस्ती करण्यात आली असून सुरक्षारक्षकांची देखील नेमणूक केलेली आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी रुग्ण आणि डॉक्टरांशी प्रत्यक्षात चर्चा केली असता कोणत्याही रुग्णाला गंभीर त्रास नसून औषधोपचार सुरू असल्याचे सांगितले.

कोविड सेंटरमध्ये ६७० रुग्णांची व्यवस्था
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपाने कोविड सेंटर सुरू केले असून त्याठिकाणी ६७० रुग्ण उपचार घेतील अशी व्यवस्था आहे. एका इमारतीमध्ये स्वब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची शक्यतो आरटीपीसीआर चाचणी केली जात असून एखादा गंभीर रुग्ण असेल तर त्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे.

 

Protected Content