महापालिकेचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे सुधारीत व सन २०२२-२३ चे मुळ अंदाजपत्रक प्रशासनाने मागील महासभेत सादर केला होता. यात ५ कोटींची वाढ करून ९७७.४६ कोटी करण्यास सर्वानुमते मजुरी देण्यात आली.

 

महापालिकेची स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने प्रशासनाने अंदाजपत्रक स्थायी सभेत न सादर करता प्रशासनाने थेट महासभेत सादर केला. अर्थसंकल्पाची विशेष महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
महापालिकेतर्फे आकारण्यात येणार्‍या मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारे अवाजवी वाढ करण्यात आलेली नाही. घरपट्टी वसुलीचे उद्दिष्टात वाढवून ५ कोटी करण्याची सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केली. तसेच खर्च बाजूत प्रसूतीगृहासाठी ५० लाखांची वाढीव तरतूद करण्याचे सुचविले आहे. मनपा शाळांच्या विकासांसाठी १ कोटी, नवीन संडास व मुतारीसाठी ५० लाख, नवीन गाटारींसाठी १ कोटी व बगीचा, वृक्षलागवडसाठी अधिकचे ५० लाख असे एकूण ३ कोटी ५० लाखांची वाढीव तरतूद करण्याची सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्यात. प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील विकास कामे करण्यासाठी ५० लाखांचा निधीची तरतूद अर्थ संकल्पात करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी केली होती. मात्र, महापालिकेचा उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्याने त्यांची मागणी फेटाळण्यात आली. दरम्यान स्वच्छता, महिला सबलिकरण, विकास कामे याबाबत योग्य तरतूद करण्यात आली असल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली. महापालिकेत अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असून दैनदिन कामात अडचण येवू नये यासाठी कंत्राटी पद्धतीने अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्या मानधनासाठी २ कोटींची तरतूद करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका अॅड. शुचिता हाडा यांनी केली. ती मान्य करण्यात आली नाही. दरम्यान, जळगाव शहरवासियांना आपण सुविधा काय देतोय याचा विचार प्रशासनाने करायला हवा. प्रशासनाच्या गलथानपणामुळे अनेक चुका झाल्या आहेत. नागरिक लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त करतांना दिसतात याचाही विचार होणे अपेक्षित आहे. वाढीव घरपट्टीवर तोडगा काढावा अशी अपेक्षा डॉ.सचिन पाटील यांनी व्यक्त केली.

Protected Content