खान्देशचे थोर सुपुत्र पद्मश्री डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांना यंदा साहित्य अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. याच्या पाठोपाठ आज लोकमतच्या जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा !
डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी २७ मे १९३८ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. जळगाव जिल्ह्यातील भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूल मधून प्रथम श्रेणित शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर (१९५५) त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. तद्नंतर डेक्कन कॉलेजातून भाषाविज्ञान विषयात एम. ए. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. नंतर १९६४ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम. ए. (इंग्लिश लिटरेचर ) पदवी मिळवली.उत्तर महाराष्ट्र (आताचे कवयित्री बहिणाबाई उमवि) विद्यापीठाने त्याना सन्मानार्थ डिलिट उपाधी देऊन सन्मानित केले आहे.
डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी अहमद नगर, धुळे, औरंगाबाद, गोवा, मुंबई अशा विविध ठिकाणी (१९६४ ते १९९८) या कालावधीत प्राध्यापक, प्रपाठक, विभागप्रमुख म्हणून जबाबदार्या पार पाडल्या. १९९१ ते १९९८ या काळात मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव रविंद्रनाथ टागोर तौलनिक साहित्य अध्यासनामध्ये अध्यापन केले. इंग्रजी भाषा आणि साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य हे त्यांच्या अध्यापनाचे व संशोधनाचे विषय होते. त्यांचा लेखन प्रवास फर्ग्युसन महाविद्यालय असताना नियतकालिकात छापून आलेल्या ’ निळे मनोरे ’ या कवितेपासून झाला. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांची ’ कोसला ’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांना मराठी कादंबरी विश्वात नावलौकिक मिळवून दिला. आज पन्नास वर्षानंतरही कोसलाची जादू तशीच कायम आहे.
त्यानंतर त्यांच्या बिढार, जरीला, झुल , हूल, हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ इत्यादी कादंबर्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचे मेलडी व देखणी हे कविता संग्रही खूप गाजले. साहित्याची भाषा, टीकास्वयंवर, तुकाराम, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण ही समीक्षात्मक पुस्तके त्यांच्या संशोधक व चिकित्सात्मक प्रतिभेची परिचायक आहेत. दि इन्फ्लुअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी, अ सोशिओलिंग्विस्टिक ऍन्ड नेटिविझम ही इंग्रजी समीक्षात्मक पुस्तकेही खूपच गाजली. त्यांच्या प्रकाशित साहित्याचे इंग्रजी, हिंदी, तेलगू, तमिळ कन्नड, मल्याळम, गुजरती, पंजाबी, उड़ीसा, उर्दू अशा विविध भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले आहेत. झूल आणि हिंदू कादंबर्या तर चक्क अंधांसाठी असलेल्या ब्रेल लिपीत रूपांतरित झाल्या आहेत.
डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या लिखाणाचे पडसाद मराठी साहित्यावर उमटत राहिले. अनेकदा वादंगही माजलेत. नेमाडे हे परखड व सडेतोड लेखन वा भाषण करणारे असल्याने सनातन्यांना त्यांचे विचार आवडत नाही. पण नेमाडे या गोष्टींना भिक घालत नाहीत. त्यांचा देशीवाद अनेकांच्या पचनी पडत नाही. मराठी भाषेचा प्रखर अभिमान असल्याने त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे थेर आवडत नाही. मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांतून शिक्षण दिले गेले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष आहे.
कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर, झूलचा नायक चांगदेव पाटील व सह नायक नामदेव भोळे तर खान्देशातील सातपुडा पर्वत-परिसरातील मोरगावचा शेतकरी-वारकरी परिवारातील खंडेराव हा हिंदू कादंबरीचा नायक व निवेदक आहे. अनेक जाती-जमातींच्या भाषांचा वापर हेही हिंदू कादंबरीचे विशेष सांगता येईल. नेमाडे यांच्या साहित्य सेवेला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ह. ना. आपटे पुरस्कार, कुरुंदकर पुरस्कार,कुसुमाग्रज पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार व हिंदू कादंबरीला मिळालेला साहित्यातील सर्व श्रेष्ठ ’ ज्ञानपीठ पुरस्कार (२०१४ ) आदी अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले आहेत.
भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा बहुमानाचा पुरस्कार (२०११) देऊन सन्मानित केले आहे.
साहित्य विश्वात तळपत असलेल्या व साहित्य जगतातील सोनेरी पान गणल्या जाणार्या ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या डॉ.भालचंद्र नेमाडे यांना २८ डिसेंबर २०१९ रोजी नरिमन पॉइंट वरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित समारंभात हिंदीचे सुप्रसिद्ध कवी व गीतकार गुलजार यांच्या हस्ते उजाला प्रतिष्ठानचा उजाला शब्द सन्मान-सर्वोच्च आकाशदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. भालचंद्र नेमाडे सरांना साहित्य अकादमीचा सन २०२२ चा सर्वोच्च पुरस्कार महत्तर सदस्यता (फेलोशिप) प्रदान करण्यात आला. या आधी हा पुरस्कार ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ दकवी कै. विंदा करंदीकरांना मिळाला होता २६ वर्षानंतर मराठी साहित्यिकाला लाभलेला हा पुरस्कार मराठीची मान उंचविणारा आहे. या सन्मानामुळे गेल्या ५० वर्षातील संपूर्ण देशातील २५ भाषांमधील मोठमोठ्या लेखकांच्या रांगेत बसवल्याने भारतीय लेखक सुखावला आहे. वाढत्या प्रादेशिक उन्मादाचे खूळ नष्ट केले पाहिजे. अशा वृत्तींचा साहित्यात अकादमीने दूर ठेवले पाहिजे. असे उद्गार त्यांनी पुरस्कार स्वीकारते वेळी काढले होते.
साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना त्याच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी लोकमतचा जीवनगौरव पुरस्काराने दि. २३ मार्च रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे वरील पुरस्कार त्याना प्रदान करण्यात येणार आहे. अशा लोकोत्तर साहित्यिकाचा या निमित्ताने हा अल्पसा परिचय देत आहे. डॉ.भालचंद्र नेमाडे हे समाजाला लाभलेलं साहित्य क्षेत्रातील एक प्रखर नेतृत्व आहे. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. यापुढेही त्यांच्या हातून साहित्य सेवा घडत राहावी व त्यासाठी त्यांना दीर्घायुरारोग्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना.शुभंभवतु.
–प्रा. डॉ.राम नेमाडे, डोंबिवली