चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नऊ महसूल प्राप्त गावांना चार वर्षे उलटूनही ऑनलाईन नोंद नसल्याने आज सकाळपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मात्र पंधरा दिवसात पाच गावांची ऑनलाईन नोंद करण्यात येईल असे लेखी आश्वासन मिळाल्याने दुपारी उपोषणाची सांगता करण्यात आली.
तालुक्यातील चैतन्य तांडा, इच्छापूर तांडा क्र. एक, दोन व तीन, सुंदरनगर, हरीनगर, वलठाण बत्तीस नं. तांडा, शामवाडी, दीपनगर व साईनगर आदी गावांना महसूलाचा दर्जा मिळावा यासाठी दिनकर राठोड यांनी अथक प्रयत्न केले. त्यानंतर त्यांच्या संघर्षाला यश आला. २०१८ मध्ये वरिल नऊ तांड्यांना शासनाने महसुलाचा दर्जा दिला. मात्र चार वर्षे उलटली तरीही भूमि अभिलेख विभागाने या गावांची ऑनलाईन नोंद केलेली नाही. (यात ऑनलाईन महसूल दर्जा, ७/१२ उतारा, नकाशा व आकारबंद आदींचा समावेश असतो.) त्यामुळे वरील गावे शासकीय योजनांपासून वंचित आहे. यामुळे देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी साजरा करत तर दुसरीकडे या प्रगत देशात आजही गावांना न्यायासाठी इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. हि शोकांतिका आहे. दरम्यान ऑनलाईन नोंदीची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी दिनकर राठोड यांनी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे शिफारस पत्र संबंधीत विभागाला सादर केले.
परंतु लोकप्रतिनिधींच्या आदेशाला देखील भूमि अभिलेखाने केराची टोपली दाखवली. त्यामुळे चार वर्षे उलटूनही न्याय मिळत नसल्याने सोमवार, १ रोजीपासून विजाभजा तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. परंतु येत्या पंधरा दिवसात नऊ पैकी पाच महसूल गावाची ऑनलाईन नोंद करण्यात येईल असे, लेखी आश्वासन तहसीलदार अमोल मोरे आणि उप अधीक्षक भगवान भोये, भूमी अभिलेख, चाळीसगाव यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र पंधरा दिवसात महसूल गावाची ऑनलाईन नोंद झाली नाही. तर याविरोधात खंडपीठ औरंगाबाद येथे धाव घेण्यात येईल असा इशारा यावेळी विजाभजा तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी दिले आहे.