मुंबई : वृत्तसंस्था । महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अल्टामाऊंट रोड येथील रॉयल स्टोन निवासस्थानी नगरच्या पांडुरंग वाघ या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले.
वाघ यांना २०१८ मध्ये वाळूउपसा व वाहतुकीचा परवाना मिळाला होता. त्यासाठी त्यांनी आठ लाख ७२ हजार रुपये भरले होते. मात्र वाळूउपसा करण्यास स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे त्यांना वाळू काढणे शक्य झाले नाही. परवान्यासाठी भरलेली रक्कम परत मिळावी या मागणीसाठी ते बुधवारी महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानी आले. तेथे त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. वाघ हे नगरच्या नेवासा येथील झापडी गावचे रहिवासी आहेत.