जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्लास्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणा-यांवर महापालिकेतर्फे आज धडक कारवाई करण्यात आली. यात एमआयडीसीतील एका कंपनीतील ३ टन प्लास्टिक सह शहरातून एकूण ६ टन प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आयुक्त विद्या गायकवाड यांनी प्लास्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणारे निर्माते, वितरक व किरकोळ विक्रेते यांच्यावर धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. आज त्यांनी प्लास्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके तयार करून एकाच वेळी दंडात्मक कारवाई व जप्तीची कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. यात आरोग्य विभागाचे उपायुक्त अभिजीत बाविस्कर, महसूल उप आयुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, आरोग्य विभागाचे यु. आर. इंगळे, अग्निशामक विभागाचे शशिकांत बारी अशी पाच पथके तयार करून अचानक कारवाई करण्यात आली. या पथकांनी स्वतंत्रपणे एमआयडीसी, फुले मार्केट, बळीराम पेठ, दाणाबाजार, सुभाष चौक व इतर ठिकाणी दंडात्मक व जप्तीची कारवाई करून साडेपाच ते सहा टन प्लास्टिक जमा करून पंचावन्न हजार रुपये दंड वसूल केला. यावेळी एमपीसीबीचे श्री. चव्हाण, श्री.मनीष महाजन व श्री. मोरे व कारवाई सोबत पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त विद्या गायकवाड यांचा नेतृत्वाखाली एका पथकाने सकाळी साडेअकरा वाजता महानगरपालिकेचे अधिकारी व एमपीसीबी चे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत मे. प्रभा पॉलीमार व्ही. ११४ एमआयडीसी यांची तपासणी केली असता अंदाजे ३ टन प्लास्टिक बंद अधिनियमांतर्गत 50 मायक्रोनची परवानगी नसलेली कॅरिबॅग व डी पंच असलेल्या पिशव्या आढळून आल्याने त्या जप्त करून कंपनी मालकाला १० हजारांचा दंड आकारण्यात आला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/668292280870873