काबुल : वृत्तसंस्था । अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी एका मशिदीत बॉम्ब बनवत होते. इतरांना प्रशिक्षणही देत होते . हे करताना या बॉम्ब क्लासमध्येच बॉम्बस्फोट झाला आणि ३० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. ही घटना अफगाणिस्तानमधील बाल्ख प्रांतातील आहे.
अफगाणिस्तान सैन्याने या घटनेला दुजोरा दिला असून मृतांमध्ये ६ जण परदेशी नागरिक असल्याचंही म्हटलं आहे
अफगाणिस्तान सैन्यानं म्हटलं आहे, “तालिबानी दहशतवाद्यांच्या एका गटाला दौलताबाद जिल्ह्यातील क्वाल्टा गावात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाला आणि त्यात तेथे उपस्थित असलेल्या ३० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ परदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे.” तालिबानी दहशतवादी गावातील एका मशिदीत जमा झाले होते. तेथे त्यांना रस्त्यावर पेरण्यात येणाऱ्या आयडी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान म्हणाले, “स्फोटानंतर घटनास्ळावर कुणीही जीवंत राहिलेलं नाही. हा एक मोठा आणि धोकादायक स्फोट होता. यावेळी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेलेत.” दुसरीकडे दहशतवादी संघटना तालिबानने या घटनेला दुजोरा दिलाय. असं असलं तरी तालिबानने या स्फोटात त्यांचे किती दहशतवादी मारले गेले यावर अवाक्षरही काढलेलं नाही.