मलाला युसूफझाईला तालिबान्यांची पुन्हा हल्ल्याची धमकी

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । एहसानुल्ला एहसान या तेहरीके-तालिबानच्या दहशतवाद्याने मलाला युसूफझाईला  पुन्हा हल्ला करण्याची धमकी  ट्विटरवरून दिली आहे. पुढच्यावेळी काही चूक होणार नाही असा इशाराही त्याने दिला आहे.

 

त्यानेच  नऊ वर्षांपूर्वी नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाईला गोळ्या घालून जखमी केले होते. ट्विटरने त्वरीत त्याचं अकाउंट निलंबित केलं आहे.

 

मलालाने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी सैन्य यांना ट्विट करून तिचा कथित मारेकरी एहसानुल्ला एहसान सरकारच्या तावडीतून सुटलाच कसा याचा जाब विचारला आहे.

 

एहसानला २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती, परंतु जानेवारी २०२० मध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या सेफ हाऊसमधून तो पळून गेला होता. नंतर एहसानची मुलाखत घेण्यात आली होती आणि ट्विटर अकाऊंटद्वारे त्याने पाकिस्तानी पत्रकारांशी संवादसुध्दा साधला होता. त्याच्याकडे एकापेक्षा जास्त ट्विटर अकाउंट आहेत, त्या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.

 

मलालाला मिळालेल्या या धमकीची चौकशी सरकार करत आहे, ट्विटरला आम्ही लगेचच ते अकाउंट निलंबित करण्यास सांगितले आहे, असं पंतप्रधानांचे सल्लागार राउफ हसन यांनी सांगितले.

Protected Content